'भारतीय क्रिकेट संघात वाद नाही'
Cricket News and Scores
Thursday, February 23, 2012 AT 05:00 AM (IST)
मुंबई (mumbai) - ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील भारतीय संघात दुफळी असल्याच्या वृत्ताचे बीसीसीआयकडून बुधवारी खंडन करण्यात आले. ""भारतीय संघात दुफळी नाही. या संदर्भात आम्ही संघव्यवस्थापनाशी चर्चा केली,'' असे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी सांगितले.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीदेखील श्रीनिवासन यांच्याशी सहमती दर्शवली. ""सेहवागच्या विधानाचा विपर्यास केला गेला. संघात कसलेही मतभेद नाहीत. प्रसारमाध्यमांनी उठवलेले हे वादळ आहे. बीसीसीआय सातत्याने संघव्यवस्थापनाच्या संपर्कात आहे. आघाडीच्या फलंदाजांच्या "रोटेशन'वरून टीका होत असली तरी तो संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे,'' असे शुक्ला यांनी स्पष्ट केले. कर्णधार महेंद्रसिंग ढोणी आणि सलामीवीर वीरेंदर सेहवाग यांच्यातील विसंवादी वक्तव्यानंतर भारतीय संघात मतभेद असल्याचे छापून आले होते.
सेहवागसह तेंडुलकर आणि गंभीर हे सिनियर्स क्षेत्ररक्षणात संथ असल्याने अतिरिक्त धावा खूप जातात. त्यामुळेच "रोटेशन' पद्धत राबवल्याचे जाहीर वक्तव्य ढोणीने रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीनंतर केले. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर सेहवागने ढोणीच्या मताशी असहमती दर्शवली. क्षेत्ररक्षणाचा "रोटेशन' पद्धतीशी काहीही संबंध नाही. तसे माझ्यासह अन्य सिनियर्सना सांगण्यात आले नव्हते, असे सेहवागने बोलून दाखवले.