भारतरत्नसाठी ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस, सचिन वेटिंगमध्ये?
Cricket News and Scores
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
नवी दिल्ली (new delhi) - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिवंगत हॉकीपटू ध्यानचंद आणि दिवंगत एव्हरेस्टवीर शेर्पा तेनसिंह यांच्या नावांची शिफारस केली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावाचा मात्र या पुरस्कारासाठी विचार झालेला नाही.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या शिफारशी केंद्रीय गृह मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांच्याकडे गेल्या आहेत. तिथेच भारतरत्न संदर्भात अंतिम निर्णय होणार आहे. प्रजासत्ताक दिनी भारतरत्न पुरस्काराच्या मानकऱ्याचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
याआधी भारतरत्न पुरस्काराच्या पात्रता अटींमध्ये खेळाडूंचा समावेश नव्हता. अलिकडेच नियमांमध्ये दुरुस्ती करुन खेळाडूंचाही भारतरत्नच्या पात्रतेत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला भारतरत्न पुरस्कार दिला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र आता या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे यंदाचा भारतरत्न पुरस्कार खेळाडूला मिळाल्यास तो हॉकीपटू ध्यानचंद किंवा शेर्पा तेनसिंह यांच्यापैकी एखाद्याला मिळण्याची शक्यता आहे.