दुसऱ्या दिवसअखेर भारत अडचणीत
Cricket News and Scores
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
ऍडिलेड (edled) - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऍडिलेड ओव्हलच्या खेळपट्टीवर मायकेल क्लार्क आणि रिकी पॉंटिंग यांनी झळकवलेल्या द्विशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे. ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 7 बाद 604 धावांवर घोषित केला. या धावसंख्येसमोर भारताची दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 61धावा अशी बिकट अवस्था झाली आहे. सचिन तेंडुलकर 12 आणि गौतम गंभीर 30 धावांवर खेळत आहेत.
सुरुवातीच्या षटकामध्ये चौकार मारणारा कर्णधार वीरेंदर सेहवाग मोठी धावसंख्या उभारण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला. हिल्फेनहासच्या गोलंदाजीवर कोवानने सेहवागचा झेल सोडला होता. मात्र सिडलने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपून सेहवागला 18 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर राहुल द्रविडची भिंत भेदण्यात पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश आले. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हिल्फेनहासने राहुल द्रविडला त्रिफळाचित केले. द्रविडने फक्त एक धाव केली. द्रविडचा सलग चौथ्यांदा त्रिफळा उडाला.
तत्पूर्वी, कर्णधार मायकेल क्लार्कच्या लागोपाठच्या दुसऱ्या द्विशतकामुळे आणि रिकी पॉंटिगच्या शानदार शतकामुळे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 604 धावांचे मोठे आव्हान समोर ठेवले. ऑस्ट्रेलियाने 604 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने 221 धावांची दमदार खेळी केली. झहीर खानने त्याला तेंडुलकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. पॉंटिंगने आपल्या द्विशतकामध्ये 21 चौकार लगावले. झहीरच्या चेंडूवर पुलचा शॉट खेळताना पॉंटिंग बाद झाला.
तत्पूर्वी माईक हसीच्या रूपात भारतीय संघाला दुसरे यश मिळाले. अश्र्विनच्या षटकात 25 धावांवर तो धावबाद झाला. शॉर्ट लेगला उभ्या असलेल्या गंभीरने हसीला धावबाद केले. दुसऱ्या दिवशी उपाहारानंतरच्या पहिल्या षटकात यादवने द्विशतक झळकावलेल्या कर्णधार क्लार्कचा त्रिफळा उडवला. क्लार्क 210 धावांवर बाद झाला. क्लार्क आणि पॉंटिंग जोडीने 386 धावांची भागीदारी केली. पॉंटिंगच्या द्विशतकानंतर मायकल हसीला गंभीरने 25 धावांवर धावबाद केले. हसी बाद झाल्यानंतर आलेल्या हॅडिनच्या साथीत पॉंटिंगने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, तो 221 धावांवर झहीर खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. सिडलही 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर हॅरिसने फटकेबाजी करीत संघाला 600 धावांचा टप्पा पार करून दिला. अखेर ऑस्ट्रेलियाने 7 बाद 604 धावांवर डाव घोषित केला.
यष्टीरक्षक फलंदाज हॅडिन 42 आणि हॅरिस 35 धावांवर नाबाद राहिले. भारताकडून अश्र्विनने तीन, झहीर खान दोन तर उमेश यादवने एक गडी बाद केला.