Last Update: 


 
प्रजासत्ताकातले काही अधिक उणे
Editorial
Thursday, January 26, 2012 AT 05:00 AM (IST)
Tags: editorial
भारतीय प्रजासत्ताकाचा 62 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. जगात अनेक देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतात पण भारतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असे दोन राष्ट्रीय दिन साजरे होत असतात.  यामागची कारणे लक्षात घेतली पाहिजेत. आपण दोन सण का साजरा करतो हे आधी पाहिले पाहिजे आणि हा दुसरा सण आपण 26 जानेवारीलाच का साजरा करतो हेही पाहिले पाहिजे. आपण केवळ स्वतंत्रच झालो असे नाही तर प्रजासत्ताक देश झालो. आपल्या प्रजासत्ताकाचा कारभार कसा चालावा हे ठरवण्यासाठी आपण आपली राज्य घटना तयार केली. तिच्या अनुरोधाने कारभार चालवला जावा असा निर्णय घेतला. ही घटना तयार करण्यासाठी निवडण्यात आलेल्या घटना परिषदेचे अध्यक्षस्थान नंतर आपले पहिले राष्ट्रपती झालेले डॉ. राजेन्द्र प्रसाद हे होते. घटना तयार करणे म्हणजेच घटनेतल्या कलमांचा मसुदा लिहून काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेर आंबेडकर हे होते. या समितीत 10 सदस्य होते पण अध्यक्ष डॉ. आंबेडकर हे होते आणि घटनेचा मसुदा तयार करण्यास त्यांनी सर्वाधिक योगदान दिले. त्यामुळे त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात.  त्यांनी घटना तयार करून ती 26 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेन्द्र प्रसाद यांना सादर केली. नंतर आपल्या देशात लोकनियुक्त सरकार निवडण्याच्या कामाला गती आली. घटना सादर केल्याचा हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. घटना सादर करण्यास 26 जानेवारी हाच दिवस का निवडण्यात आला यालाही एक इतिहास आहे.
 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात कॉंग्रेसचा मोठा वाटा आहे. भारताला कॉंग्रेसच्या प्रयत्नांनी स्वातंत्र्य मिळाले पण ते काही एकदम मिळाले नाही. भारतावर ब्रिटीशांची सत्ता होती आणि त्यांनी भारताला टप्प्या टप्प्याने म्हणजेच हप्त्याहप्त्याने स्वातंत्र्य दिले आहे. 1861 साली त्यांनी  या दिशेने पहिले पाऊल टाकले होते. ब्रिटीशांची सत्ता गव्हर्नर जनरलच्या मार्फत राबवली जात असे. 1861 साली स्वातंत्र्याचे पहिले पाऊल टाकत इंग्रजांनी या गव्हर्नर जनरलच्या हाताखाली भारतीय सदस्यांचा समावेश असलेले कौन्सील नेमण्याचा निर्णय घेतला.  नंतर हळुहळु या कौन्सीलचे अधिकार वाढवत नेले आणि  1938 साली ब्रिटीशांच्या अधिपत्याखालीच पण पूर्ण भारतीय सदस्य असलेले, लोकांनी निवडलेले सरकार सत्तेवर आले. आपल्या देशातले स्वातंत्र्याचे आंदोलन पूर्ण स्वातंत्र्यासाठी नव्हतेे. मर्यादित स्वातंत्र्यासाठी होते. याचा अर्थ असा की आपले नेते, ब्रिटीशांच्याच हुकमतीखाली अंतर्गत स्वातंत्र्य मागत होते. देेशात आमच्या जनतेने निवडलेलेच सरकार असेल पण ते  इंग्लंडच्या राणीच्या हुकमतीखाली असेल असे या नेत्यांचे म्हणणे होते. आपण मागत होतो ती स्वातंत्र्य मर्यादित होते. पण तरुण नेते असे अर्धेमुर्धे स्वातंत्र्य मागण्यावर समाधानी नव्हते. नेहरू, पटेल आणि सुभाष बोस असे त्या काळातले तरुण नेते पूर्ण स्वातंत्र्य मागितले पाहिजे असे म्हणत होते. गांधीजीसारखे नेते या तरुणांना एकदम पूर्ण स्वातंत्र्य मागू नये असा सबुरीचा सल्ला देत होते.
 अखेर 1929 साली तरुण नेत्यांची सरशी झाली आणि पंडित नेहरुंच्या अध्यक्षतेखाली लाहोरमध्ये झालेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला. ही घटना क्रांतिकारक होती. म्हणून 1929 पासून आपल्या देशात 26 जानेवारी हा दिवस पूर्ण स्वातंत्र्य मागणीचा दिवस म्हणून पाळला जात होता. या दिवसाला असे महत्त्व असल्यामुळे घटना तयार झाल्यानंतर ती अध्यक्षांना सादर करण्यासाठी हाच दिवस निवडण्यात आला. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण पूर्ण स्वातंत्र्य मागितले. ब्रिटीश या देशातून पूर्णपणे निघून गेले म्हणून आपण या स्वातंत्र्याला पूर्ण स्वातंत्र्य मानतो पण आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाचे विभाजन झाले. पाकिस्तान आणि भारत असे दोन देश झाले. तशा अर्थाने हे स्वातंत्र्य अपूर्ण आहे. ते अपूर्ण तर आहेच पण ज्या लाहोर शहरातल्या अधिवेशनात कॉंग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली ते लाहोर शहर पाकिस्तानात गेले आहे. तेव्हा आपण या प्रजासत्ताक दिनाला एक प्रतिज्ञा केली पाहिजे की ज्या लाहोर मध्ये हा ठराव मंजूर झाला त्या  लाहोर शहरासह पाकिस्तान देश भारतात आला पाहिजे. हे दोन देश कधीना कधी एक होऊन अखंड हिंदुस्तान निर्माण झाला पाहिजे. हे आपले स्वप्न असले पाहिजे. आपला देश अखंडच राहिला असता पण ब्रिटीशांच्या कुटील कारवायांनी त्याचे विभाजन झाले. जगातले असे काही देश विभाजित झाले होते. व्हिएतनामची फाळणी झाली होती. जर्मनीचे दोन तुकडे झाले होते पण कालांतराने या देशांनी आपल्या दरम्यान बांधण्यात आलेली भिंत पाडली आणि ते देश अखंड झाले. आता आपल्यालाही असे करता येते. आपण जन गण मन ही प्रार्थना म्हणतो पण तिच्यातला पंजाब पूर्णपणे आपल्या ताब्यात नाही. सिंध पूर्ण पाकिस्तानात आहे. बंग म्हणजे बंगालही निम्मा पाकिस्तानात आहे. हे सारे प्रांत कधीना  कधी आपल्यात येतील आणि आपले अखंड भारताचे स्वप्न कधी ना कधी पूर्ण होईल अशी प्रार्थना आपण आज करू या !  


 
© Copyrights 2010 marathwadaneta.com - All rights reserved.
of
Powered By: